मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ओझरखेडा तलावात आज जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ‘ज्या मंत्र्यांना जे खाते दिले आहे ते खाते त्या मंत्र्यांनी व्यवस्थित चालवले पाहिजे’ असे वक्तव्य करत चंद्रकांत पाटलांनी चक्क सरकारलाच टोला मारला आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसैनिकांसह ओझरखेडा तलावात जलसमाधी आंदोलन केले. ओझरखेडा तलावात तापी नदीतून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आश्वासन देऊनही दखल न घेतल्याने हे आंदोलन केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
राज्यात त्रिपक्षीय महाविकास आघाडी सत्तेत असतानाही सत्ताधारी पक्षातील आमदारांना आंदोलन करण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे या जलसमाधी आंदोलनातून आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे घरचा आहेर दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.