जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा शल्यचिकित्सक नागोजिराव चव्हाण यांच्यावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटरचा घोटाळा केल्याप्रकरणी माहिती कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी नुकताच आरोप लावला असून यासंदर्भात आज जिल्हा शल्य चिकित्सक एन एस चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका प्रसारमाध्यमांशी झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, चुकीच्या माहितीच्या आधारावर हे आरोप लावले गेले आहेत. मुळात ज्या वस्तूंबाबत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटरचे पेमेंट अद्याप मिळालेले नाही. जर पेमेंट मिळाले नाही तर घोटाळा कसा होऊ शकतो? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही सर्व प्रक्रिया शासकीय जीएम पोर्टलवर राबवली जात असते. या पोर्टलवर ज्या कंपनीने कमी दरात योग्य वस्तू देण्याचे कळविले असते त्यांच्याकडून या वस्तू खरेदी केल्या जात असतात. जर ही शासकीय पोर्टलवर राबवली जाणारी बाब असेल तर त्यात घोटाळा करता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
याबाबत आलेल्या वस्तुंच्या सिरीयल नंबर मध्ये बदल झाला असल्याचे दिसून आले आहे मात्र हा बदल ट्रान्सपोर्टच्या एका सामान्य चुकीमुळे झालेला आहे. ही विशेष अशी बाब नसून याबाबत ज्याचौकशी कमिटीने अहवाल तयार केला आहे तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जर यामध्ये कुणाला काही शंका असेल तर त्यांनी न्यायालयात धाव घ्यावी. याबाबत जर मी दोषी आढळला तर मी कोणत्याही शिक्षेसाठी तयार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक एन एस चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
वास्तविक अशा वस्तूंच्या खरेदीबाबत कोणताही ब्रँड अथवा मॉडेल हे निश्चित नसते. जी कंपनी कमी दरात योग्य वस्तू उपलब्ध करून दिली देईल त्या कंपनीला वस्तू संदर्भात मागणी करण्यात येते. त्यामुळे याबाबत देण्यात आलेली घोटाळ्याची माहिती ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जिल्हा शल्य चिकित्सक नागोजी चव्हाण यांच्या बदली संदर्भात चर्चा चालू असल्याचे दिसून आले आहे. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून मी स्वतः बदलीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र माझ्या जागेवर जोपर्यंत दुसरे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मी माझे पद सोडू शकत नाही. मुळात या ठिकाणी राहण्याची मला एक मिनिटही इच्छा नाही. त्यामुळे मी स्वतः इथून बदली करण्यासंदर्भात प्रयत्न करत आहे. मात्र योग्य अधिकारी माझ्या जागेवर येईपर्यंत मला पद सोडता येणार नाही. माझ्या जागेवर येण्यासाठी साठी सध्या काही अधिकारी इच्छुक असल्याचे मला कळले असून त्यामुळे आता याबाबत पुढे काय घडामोडी होतात हे सर्वांना कळेलच, असे एन एस चव्हाण यांनी सांगितले.