मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला पाचव्यांदा जाणे टाळले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत तीन पानी पत्र ईडीकडे पाठवले होते. अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश यांनाही ईडीने समन्स बजावले होते, मात्र तेही चौकशीला उपस्थित नव्हते. दरम्यान भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अनिल देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची कितपत भागीदारी होती याचीही चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे यावर महाविकास आघाडीसोबतच शरद पवार काय भूमिका स्पष्ट करतात यावर लक्ष लागून आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये ईडी ही चौकशी करते आहे. याप्रकरणी देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा ईडीने समन्स बजावले होते, मात्र देशमुख एकाही चौकशीला हजर झाले नाहीत.