पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या शंभर वर्षांपासून खाद्य परंपरा आणि पुण्याची ओळख असणाऱ्या चितळे बंधूंनी रक्षाबंधन या भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या सणाचे औचित्य साधून आपल्या उत्पादन कंपनीच्या नावात बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे खावय्यांची पहिली पसंत असलेले चितळे बंधू मिठाईवाले आता ‘चितळे बंधू – भगिनी मिठाईवाले’ या नावाने आपली नवी ओळख ठेवणार आहेत.
गेल्या शंभर वर्षांपासून सुरु असणारी ही ‘खवय्ये आणि चितळे’ परंपरा यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त चितळेंनी बदलायचा निर्णय घेतला असून याबाबत एक अधिकृत व्हिडीओ सर्वांसाठी खुला करून माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जाहिरातीमधील कथानक असून यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री स्पृहा जोशी आणि निर्मिती सावंतही आहेत. या जाहिरातीमध्ये संकर्षण आणि स्पृहा हे आई-बाबा दाखवण्यात आले असून त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या कार्यक्रमाला ते आशा ताईंची वाट बघत असतात. सर्व पाहुणे आल्यानंतरही स्पृहा आणि संकर्षण आशा ताईंसाठी थांबलेले असतात. अखेर आशाताई म्हणजेच निर्मिती सावंत बारश्याला पोहचतात आणि या दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.
चितळे उत्पादकांच्या या नव्या नावाची सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात असून याचे स्वागत केले जात असल्याचे दिसून आले आहे. चितळे यांच्या उत्पादनाची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख असल्याने या बदलत्या नावाकडे सर्व खवय्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.