(राजमुद्रा धुळे) (ता 10) मांडळ धरणातून धुळे तालुक्यातील मांडळ, बोरकुंड, रतनपुरा, दोंदवाड या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 3.037 दक्षलक्ष घनफूट एवढे आरक्षित पाणी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, धुळे यांच्या शिफारशीनुसार टंचाई निवार कामी बोरी नदीत पात्रात सोडावे असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
या गावांकरीता मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक 4 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणेच्या शिफारशीनुसार या धरणात दशलक्ष 3.037 दशलक्ष घनफुट आरक्षित पाणी 10 मे नंतर सोडण्यासाठी पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीवर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदार, धुळे ग्रामीण यांनी टंचाई सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला आहे.
मांडळ, बोरकुंड, रतनपुरा ता. धुळे या गावांपर्यंत पाणी घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, उप अभियंता वीज वितरण कंपनी , पोलिस निरीक्षक, उप अभियंता पाटबंधारे विभाग व तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्तीकरित्या राहील. पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्तरावर उक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक स्थापन करुन या पथकाने नदीप्रवाहात अवैधरित्या पाणी अडविणे, व अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.
पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी पाटबंधारे विभागास जमा करुन देवून त्यानंरतच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. संबंधित गावांना आवर्तन सोडल्याबाबत विविध माध्यमातून अवगत करण्याची कार्यवाही संबंधित कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी यादव यांनी आदेशात नमूद केले आहे.