जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात पोलिस मुख्यालयात असलेल्या महिला कर्मचारीच्या नावावर पोलीस आणि पत्रकारांना अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेत तक्रार केली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयातच कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस मुख्यालयात महिला कर्मचारीच्या नावावर काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व काही पत्रकारांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित महिलेने सायबर गुन्हे शाखेत याची तक्रार दाखल केली होती. या अंतर्गत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शोध घेतले असता सदर व्यक्तीचे लोकेशन नाशिक येथे आढळून आले.
मोबाईल लोकेशन आणि सीसीटीवी फुटेज यांची तपासणी केली असता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.