मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. गोऱ्हे यांच्या या टीकेला आता राणेंनीही प्रत्युत्तर दिलं असून, नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं. माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल, असा टोला राणे यांनी लगावला आहे. राणे यांची जन-आशीर्वाद यात्रा आज वसईमध्ये दाखल झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली होती.
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी हा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्री शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला.