जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : राज्यपालांनी नियुक्त करण्याचा अधिकार असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला तरी येत्या गुरुवारी २६ ऑगस्ट रोजी होणार्या राज्यपालांच्या उपस्थितीत या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे राजकीय संकेत मिळाले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर निर्णय लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्ती १२ आमदारांच्या नावांची यादी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. मात्र त्यावर राज्यपालांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या नियुक्ती संदर्भात राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. राज्यपालांच्या या भूमिकेविषयी अनेक राजकीय नेत्यानी विविध प्रश्नांचा भडीमार केला होता. तसेच नियुक्ती बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर हा पेच आता सुटण्याची शक्य ता निर्माण झाली आहे. परंतु इतके दिवस हे नियुक्तीचे प्रकरण का रखडले याचे राजकीय वास्तव काय आहे यावर चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव देखील यादीत असल्यामुळे हे प्रकरण लांबत राहिले असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि खडसे यांच्या कारणावरून या बैठकीत राज्यपाल फायनल शिक्कामोर्तब करतात काय याकडे सर्वांचे राजकीय लक्ष लागून आहे.
कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात भाजपला रामराम ठोकून आलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचे अद्यापही राष्ट्रवादी पाहिजे त्या प्रमाणात पुनर्वसन झालेले नाही. राष्ट्रवादीत त्यामुळे त्यांचे समर्थकही वाऱ्यावर आहेत. एकनाथ खडसे यांना एखादे मोठे पद देऊन त्यांचे पुनर्वसन करावे म्हणून राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार पदाची घोषणा झाल्यानंतर त्यांना वजनदार मंत्रिपद मिळण्याची दाट राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यपालांच्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या भूमिकेवर अवलंबून आहे. याला राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.