(राजमुद्रा धुळे) धुळे शहरालगत साक्री रोडवर जवाहर मेडीकल फाऊंडेशन हे धुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ.कुणाल पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. त्यांच्याच आशिर्वादाने जवाहर मेडीकल फाऊंडेशनमध्ये कोरोनाच्या नावावर रुग्णांची सेवा करण्याऐवजी रुग्णांना लुटण्याचा प्रकार सुरु आहे. शासननियमानुसार जवाहर मेडीकल फाऊंडेशनमध्ये कमीत कमी १२० ऑक्सीजन बेडची मंजूरी आहे. परंतू जेमतेम फक्त ५० ते ६० बेड कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत. तसेच या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कोवीड सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा एजंटमार्फत काळाबाजार सुरु असून अशा रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या जवाहर फाऊंडेशनच्या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी धुळे तालुका भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी भाजपाचे माजी कृषी सभापती अरविंद जाधव, माजी जि.प.सदस्य राम भदाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, जापीचे सरपंच भैय्या पाटील, नगावचे जेष्ठ नागरीक बाळू पाटील, कापडणेचे माजी उपसरपंच भटू पाटील उपस्थित होते. सदर निवेदनात भाजपाने म्हटले आहे की, कोरोना महामारीत संपुर्ण जग होरपळून निघत असतांना मात्र धुळे ग्रामीणचे सत्ताधारी आमदार कुणाल पाटील यांच्या आशिर्वादाने जवाहर मेडीकल मध्ये काळाबाजार सुरु आहे.
वास्तवीक पाहता रुग्णांना प्रत्येक उपचाराचे बिल कायदेशीर रित्या दिले गेले पाहिजे, परंतू सदर मेडीकल फाऊंडेशनमध्ये मनमानी कारभार सुरु असल्यामुळे रुग्णांचे लाखो रुपयांपेक्षा जास्त बिले आकारली जात आहेत. शासनाच्या नियमानुसार १ लाखापेक्षा जास्तीचे बील ऑक्सीजन बेडचे यायला पाहिजे, मात्र सदर ठिकाणी बीले १ लाखापेक्षा जास्तीचे बिले आकारले जात आहे, हि एकप्रकारे रुग्णांची लुट सुरु असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शिवाय रेमडेसिवीर नावाच्या इंजेक्शनचा येथील कर्मचाऱ्यांकडून व व्यवस्थापनाकडून पद्धतशीर रित्या काळाबाजार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. तशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्र व वृत्त वाहीन्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतू सरकार मधले जबाबदार लोकप्रतिनिधी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार आपले दायीत्व विसरुन टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
गेल्या दिड वर्षापासून धुळे ग्रामीणची जनता कोरोना सारख्या आजाराने त्रस्त असतांना एकाही गावात जावून, एकाही रुग्णांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध करुण देण्यासाठी शासनाकडून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही मात्र जवाहर मेडीकल फाऊंडेशनच्या माध्यमातून जनतेसमोर खोटे दातृत्व उभे करण्याचा दांभीक प्रयत्न आ.कुणाल पाटील यांच्याकडून सुरु आहे.
ज्या रुग्णाने जवाहर मेडीकल फाऊंडेशनच्या रेमडेसिवीरच्या काळाबाजार संदर्भात व गैरव्यवहारासंदर्भात आपला आवाज उठवला त्याचा आवाज दाबण्याचा जवाहर गटाच्या जुन्या संस्काराप्रमाणे प्रयत्न केला गेला व रुग्णांच्या नातेवाईकावर दबाव टाकूण आमच्या रुग्णावर चांगला उपचार सुरु आहे अशाप्रकारचा सिनेमातील एखाद्या दृश्याला शोभेल अशाप्रकारचे चित्र जवाहर गटाच्या माध्यमातून उभे केले गेले. अशा प्रवृत्तीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी आमदार कुणाल पाटील व जवाहर मेडीकल फाऊंडेशन च्या प्रशासनाचा जाहिर निषेध देखिल यावेळी केला.
यावेळी जिल्हाधिकारी महोदयांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बाबतीत चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त करुन कोरोनाच्या काळात अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या यंत्रणेची सकोल चौकशी करावी व सदर यंत्रणेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आली.