जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा कंदील दाखवला असून त्यादृष्टीने पुढील राजकीय रचना केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पालकमंत्री पाटील हेच जिल्हा बँक निवडणुकीत महत्त्वाची मनोमिलनाची भुमिका बजावणार असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरुन दिसून येते.
जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याची घोषणा करीत असले तरी देखील त्यांची बिनविरोध करण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी सांगितले आहे.
माजी मंत्री आणि नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले दिग्गज नेते एकनाथराव खडसे व माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यातच नुकतीच जिल्हा बँकेला ईडीची नोटीस मिळाल्याने खळबळ माजली होती. या पूर्वी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली मात्र त्यांची अद्याप पर्यत सुटका झालेली नाही. बी एच आर प्रकरण देखील चांगलेच गाजत असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अडकल्याचे दिसून आले एकामागे एक प्रकरणात खडसे तसेच महाजन यांच्याशी जवळीक असलेले काहीजण बीएचआर तसेच ईडीच्या कार्यवाहीत गुंतलेले आहे. दोघे देखील एकमेकास राजकीय अडचण उभी करतांना दिसून येतात असा तर्क राजकीय जाणकारांचा आहे
जर खडसे व महाजन यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना आता जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध कशी होणार याकडे जिल्हा बँकेतील तत्कालीन तसेच आजी-माजी संचालकांचे लक्ष लागून आहे. जिल्हा बँक निवडणुकीवर जिल्ह्यातील पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार का ? याबाबत देखील काहीजण चाचपणी करीत आहे.