जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |राज्य सरकारच्या अनास्थेमुळे मराठा आरक्षण रखडले असून उचित कायदेशीर अभ्यासकांना विश्वासात न घेता न्यायालयीन लढाई लढण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी केली आहे. राज्यात 2 सप्टेंबर पासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणा संदर्भात सरकार अद्याप भूमिका जाहीर करीत नाही केंद्राने आरक्षणाचे सर्व अधिकार राज्य सरकार यांना दिले आहे. मात्र अद्याप पर्यत ओबीसींच्या राजकिय आरक्षणा बाबत सरकार मधील एकही घटक पक्ष बोलत नाही हे दुर्दैवी आहे. मराठा समाजावर त्यांच्याच राज्यात हे सरकार अन्याय करीत आहे. यामुळे 2 सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसंग्रामचे आ. मेटे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्याच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात एकूण महाराष्ट्रातील तीस आमदार सहभागी झाले असून यामध्ये शिवसंग्राम चे विनायक मेटे यांचा देखील सहभाग आहे यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध योजनांविषयी तसेच विकास कामात विषयी माहिती जाणून घेतली आहे यासंदर्भातील सर्व अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसंग्राम संघटनेचे काम राज्यभरात सुरू असून अनेक नव्या कार्यकर्त्यांना संघटन बांधण्यासाठी जोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील भाजप नगरसेवक दिलीप पोपळे यांच्याकडे सध्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात शिवसंग्राम च्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्यासाठी संघटन बांधणी ला विशेष महत्त्व देण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम चे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी दिली आहे.