जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रीय कॉग्रेसच्या राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी माजी खा. उल्हास पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने खान्देश या भागात काँग्रेसचे वलय वाढण्यासाठी माजी खा. उल्हास पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काळात काँग्रेसची स्थिती राज्यात सत्ता असताना देखील संघटनात्मक दृष्ट्या खालावली होती. मात्र डॉक्टर उल्हास पाटील यांनी रूग्ण सेवेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात काँग्रेस ठिकवण्यात यश मिळवले आहे. कोरोना काळात गोदावरी फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचारासाठी विशेष असे प्रयत्न करण्यात आले यासाठी माजी खा. उल्हास पाटील यांनी परिश्रम घेतले त्याच कामाची दखल म्हणून प्रदेश कॉग्रेसच्या वतीने पुनश्च त्यांची निवड प्रदेश उपाध्यक्षपदी केली आहे.
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यापासून काँग्रेस जळगाव जिल्ह्यात बऱ्या प्रमाणात सक्रीय झाले आहे मात्र पाहिजे तेवढे संघटन काँग्रेसला उभी करता आलेली नाही गटबाजीच्या तिढ्यात सापडलेल्या काँग्रेसला माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार अशी राजकीय जाणकारांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी खा. उल्हास पाटील यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. जिल्हा बँक,जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. निवडणुकांची युव्हरचना निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयार केली जात आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात येत आहे आपल्या भागात पक्षाच्या विजया करता झटणाऱ्या नेत्यांचे राज्याच्या विविध कमिट्या तसेच महामंडळावर नियुक्तीची संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.