(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सीजनचा टॅंक आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक रिकामा झाल्याने रुग्णालय प्रशासनात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानं यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून साठवून ठेवलेला सिलेंडरमधील ऑक्सिजन तात्काळ वापरण्याच्या सूचना केल्या. ऑक्सिजनच्या टॅंक मधला ऑक्सिजन जरी संपला असला तरी सुदैवाने ऑक्सिजन सिलेंडर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
अचानक पणे ऑक्सिजनचा टॅंक संपण्याची ही जिल्हा सामान्य रुग्णालयाची पहिलीच वेळ असल्याचे रामानंद यांनी सांगितले. रुग्णांना या परिस्थितीचा कोणताही धोका नसून बाहेरून येणाऱ्या ऑक्सिजन टॅंकशी संपर्क तुटल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता सर्व परिस्थिती हातात असून रुग्णांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. ऑक्सिजन टॅंकशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा टॅंक साधारण धुळे ते जळगाव दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे. ऑक्सिजनचा टॅंक पोहोचेपर्यंत रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सध्या 18 ते 24 तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा उपलब्ध असून रुग्णांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
जोपर्यंत ऑक्सीजन टॅंक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होऊन ऑक्सीजनचा टँक भरला जाऊन पुढील व्यवस्था सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण स्वतः व रुग्णालय प्रशासन रुग्णालय सोडून जाणार नसल्याचे डॉ रामानंद यांनी सांगितले. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नसून सर्व परिस्थिती अगदी सुरळीत असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.