जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | देशामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत सुमारे १४ लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात सुमारे २८ लाख अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविका गेली अनेक वर्ष कार्यरत असुन, सदर अंगणवाडी कर्मचार्यांच्या देशव्यापी प्रलंबित मागण्या मंजूर करणेसाठी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मा. केंद्रीय मंत्री महिला व बाल विकास सौ. स्मृती ईराणी यांच्याकडे पाठपुरावा करणे तसेच त्यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणणे बाबत खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये अस्य आहे की, अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासाठी विकसित केलेले पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशन सदोष असून त्यात बर्याच तांत्रिक चुका असून, त्याची मुख्य भाषा इंग्रजी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता विचार करता त्यात प्रादेशिक भाषेची व्यवस्था असावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कार्यरत असतांना अकाली निधन झाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंप तत्वानुसार पात्र वारसांना थेट सामवून घ्यावे. तसेच देशातील मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करून मदतनीस पत्र नसलेल्या केंद्रात सेविकेच्या रिक्त पदावर मिनी अंगणवाडी सेविकांना थेट सेविका म्हणून पदोन्नती द्यावी. यांच्यासह देशातील अंगणवाडी कर्मचार्यांचे दररोजचे काम ८ तास मोजून त्यांना शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, भत्ते व सेवेचे फायदे मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार सेवाशर्ती लागू करण्यात याव्या अशा मागण्याचे निवेदन यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांना देऊन सदर मागण्यापूर्ण होण्यासाठी तत्काळ मा.प्रधानमंत्री व मा. केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे बाबत आग्रह केला.
खासदार रक्षाताई खडसे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती घेऊन लवकरच दिल्लीला तसेच राज्यसरकार कडे याबाबत पाठपुरावा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहे असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.