जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात रात्री झालेल्या पावसामुळे अनेक परिसर पाण्याने तुंबले आहेत विकास योजनांच्या कामामुळे संपूर्ण रस्ते खोदून ठेवल्याने तलावाचे स्वरूप आले स्लम परिसरात पावसाच्या पाण्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. चाळीसगाव नंतर जळगावात देखील परिस्थिती हाताबाहेर जाते की काय ? अशी स्थिती होती. पावसाचा रोख कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला मात्र घरात थेट पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांची रात्र वैऱ्याची ठरली आहे.
खोटे नगर,शनीपेठ,चौगुले प्लॉट, कांचन नगर,तुकाराम वाडी,सावखेडा शिवारातील नारायणी नगर, बिबा नगर, शांतीनगर असे विविध भागात पाणी तुंबले होते. जर अधिक वेळ पाण्याचा विसर्ग सुरु राहिला असता तर घर सोडण्याची वेळ आमच्यावर आली असती अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या आहे. शहरातील खोलगट भागांमध्ये सर्वाधिक पाणी तुंबलेलं दिसून आले आहे. पावसाचे दिवस असताना नाले सफाई करण्यात आली नाही थातूर – मातूर जेसीबी शहरात फिरवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहे.
रात्रभर पावसाचे पाणी घराबाहेर काढण्यात अनेकांना मनस्ताप झाला.कुटुंबासहित आपल्या मुलाबाळांना जागरणाची वेळ आली यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारी घेण्यामध्ये गुंतलेले नगरसेवक मात्र या सर्व प्रकारातून अलिप्त आहे. या सर्व उत्पन्न झालेल्या परिस्थितीला जबाबदार नेमका कोण ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेला कर देऊन देखील आमची हीच परिस्थिती असेल तर आम्ही कर कशासाठी भरायचा असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. जनता मात्र रात्रभर जागली मात्र परिसरात पाहणी करता कोणताही पदाधिकाऱ्याने मदतीकरिता तसदी घेतलेले दिसून येत नाही.