जामनेर राजमुद्रा प्रतिनिधी | तालुक्यातील अनेक गावांना सतत सुरु आलेला पाऊस रात्री झालेल्या चक्रीवादळाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे मोठी हानी पिंकांची झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झालेल्या पावसाने झोडपले आहे. भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासन स्तरावर तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे व मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला असून यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे.