सांगली राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या ७५ वर्षात देशाला काँग्रेसने बलशाली केले, मात्र मोदी सरकार आता देश विकायला निघालं आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच देश धोक्यात आल्याने सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केलंय.
सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नाना पटोले बोलत होते. यावेळी पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात देश बलशाली करण्याचं काम केलं. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील लोकं देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे २०२४ हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज देश आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे, आणि ही सत्ता देश वाचवण्यासाठी असणार आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सत्तेतलं केंद्र सरकार देश कसा विकायला निघालेले आहेत, याची जाणीव करुन दिली पाहिजे, त्यामुळे येत्या काळात कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागलं पाहिजे, असंही ते म्हणाले.