जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
जामनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून केळी कपाशी पिकांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणा, नाथवाडी, ओझर खुर्द, टाकळी, तोंडापुर या गावांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले असून हातातील आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
आज गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, एकमेकांचे विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी एकाच वाहनातून प्रवास करत या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, आज जरी या दौर्यात सोबत असलो आमच्या पक्षाचा विचार जेव्हा आला तेव्हा आम्ही विरोधक आहोत, आज शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो असून जामनेर तालुक्यात आज नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याच प्रयत्न असेल, असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले