गांधीनगर राजमुद्रा वृत्तसेवा | भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे होणार आहेत. यासंदर्भात पक्षाकडून औपचारिक घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल. कारण त्यांनी नेता निवडीच्या तोंडावर भाजपला गुजरातचा नवा मुख्यमंत्री कसा असावा याची आठवण करुन दिलीय. एका अर्थानं त्यांनी स्वत:चीच दावेदारी जगजाहीर करुन टाकली आहे.
गुजरातचा मुख्यमंत्री बदलतो पण उपमुख्यमंत्री मात्र तसाच राहातो. आनंदीबेन पटेल यांना हटवून जेव्हा रुपाणींना मुख्यमंत्री केलं त्यावेळेसही नितीन पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. तेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण झाले रुपाणी. त्यावर नितीन पटेलांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्री होऊनही कार्यभार स्वीकारलेला नव्हता. शेवटी भाजप हायकमांडनं निर्वाणीचा इशारा दिला त्यावेळेस नितीन पटेल लाईनीत आले. आताही नितीन पटेल यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे. पण त्यांना केलं जाणार का याबद्दल त्यांनाही विश्वास नसावा. त्यामुळेच ऐन नेता निवडीच्या तोंडावर त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री कसा असावा तेच जाहीर करुन टाकलं. नितीन पटेल म्हणाले- गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा अनुभवी, लोकप्रिय आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तसच सर्वांना मान्य असलेलाही असावा.
नितीन पटेलांची बंडाची भाषा?
नितीन पटेल हे पाटीदार समाजातूनच येतात. नितीन पटेल हे कायम मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चर्चेत असतात. ते अनुभवी आहेत, त्यांना पाटीदार समाजाच्या पाठिंब्याचाही ते दावा करतात. सोशल मीडियावर त्यांचे काही चाहते, कार्यकर्ते सक्रिय झालेत. त्यांनीही नितीन पटेलांचं नाव पुढं केल्याचं दिसतंय. भाजपा हायकमांड मांडवीय किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कुण्या नव्या नेत्याला गुजरातचा मुख्यमंत्री करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे निर्णय तसे सरप्राईजिंग असतात. कर्नाटकात ते अनुभवायला आलेलं आहेच. तेच गुजरातमध्येही होऊ शकतं. आपल्याला डावललं जाण्याची भीती नितीन पटेलांना पुन्हा असावी, त्यामुळेच त्यांनी नवा मुख्यमंत्री सर्वांना मान्य असणारा असावा असं म्हटल्याचं जाणकारांना वाटतं.