आ.किशोरआप्पा पाटील यांचे आश्वासन..
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात राबवण्यात येत असलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी गाई व म्हैस गोठा अनुदान योजनेत मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल.हे प्रकरण पंचायतराज समितीच्या जिल्हा दौऱ्याच्या कामकाजात समाविष्ठ करून अजेंड्यावर घेतले जाईल,असे आश्वासन समितीचे सदस्य आ.किशोरआप्पा पाटील यांनी
दिले.
मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामसमृद्धी गाई व म्हैस गोठ्याच्या वैयक्तिक अनुदानाच्या योजनेत कृती आराखड्यात नसतांना सुद्धा तब्बल ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून ११२ कामांचे बिल अदा होऊन प्रचंड गैरव्यवहार,अनियमितता व राजकीय प्रभावाने शासनाची उघड फसवणूक केली जात असल्याची तक्रार जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायतराज समितीकडे करण्यात आली.
जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांवरून हा गैरव्यवहार पुढे आला आहे.याची चौकशी व्हावी यासाठी
गैरव्यवहार लक्षात आणून देऊन यात सहभागी अधिकारी,कंत्राटी टीम आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जनसंग्रामच्या वतीने काळ्या फिती लावून समितीचा दौरा अडवला जाईल,
असा इशारा श्री.ठाकरे यांनी दिला होता .याची दखल घेत पंचायतराज समितीचे सदस्य व आ.किशोरआप्पा पाटील यांनी मध्यस्थी करत समितीच्या वतीने जनसंग्रामची लेखी तक्रार स्विकारत या प्रकरणाची चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले.
जनसंग्रामच्या तक्रारीत हे आहेत गैरव्यवहाराचे मुद्दे –
राज्यात ही योजना राबवताना कंत्राटी समन्वयक कार्यरत असून ग्रामपंचायतीकडून मनरेगा योजनेचे जॉब कार्ड असलेल्या मजुरांना हे काम देणे आवश्यक असतांना ज्या लाभार्थ्यांच्या नावावर योजना मंजूर झाली आहे त्यांचीच नावे मनरेगाच्या मस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
कृती आराखड्यात अंदाजपत्रकात मंजुरी नसतांना २०१८ ते २०२१ या कालावधीत तब्बल ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन यातील ११२ गोठयांचे अनुदान व बिलाची सुमारे ५२ हजार ६०० याप्रमाणे प्रत्येकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.गोठ्याची कामे झालेली नसतांना किंबहु आपले जुने पत्री शेड किंवा वापरातील गोठे दाखवून ही रक्कम लाटण्यात आल्याच्या व त्यात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी आता होत आहेत.
तालुक्यात या योजनेचे अंमलबजावणी समन्वयक कंत्राटी शाखा अभियंता यांनी प्रत्येकी ५ हजार घेऊन ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली त्यांनतर योजना मान्य झालेल्या लाभार्थ्याच्या नावानेच मनेरेगाचे जॉब कार्ड तयार करून घेत अँडव्हान्स वसूल केलेले ५ हजार खात्यावर परतावा केल्याचा खटाटोप करून ४०-४५ लाख हडप केल्याची चर्चा आहे.
गोठा योजनेत झालेल्या या गैरव्यवहारात तालुक्यात रॅकेट सक्रिय असून लाभार्थ्याना प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून पैसे घेऊन आता बिल निघायला विलंब होत असल्याने मुक्ताईनगर पंचायत समितीत दररोज अक्षरशः जत्रा भरत आहे, असे मुद्दे नमूद केले आहेत.