(भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत परिसरात पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि जंत असल्याची तक्रार नागरिकांकडून प्रशासनाला केली होती. प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे तसेच ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे याबाबतच्या सतत तक्रारी करूनही साकेगाव ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा गटनेता रविंद्र पाटील यांनी केला आहे.
रवींद्र पाटील तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून गावात गेल्या आठ पंधरा दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्यामध्ये मार फार मोठ्या प्रमाणावर जंत आणि घाण असून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे दाखवले आहे. याबाबत सतत तक्रार करूनही त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप साकेगावच्या नागरिकांनी केला आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद गट नेते असलेल्या रवींद्र पाटलांनी येत्या दोन दिवसात या समस्येवर तोडगा काढला नाही तर साकेगाव ग्रामस्थांना सोबत घेऊन मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली जाईल असा इशारा दिला आहे.
याबाबत साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे यांना विचारले असता हे पाणी दूषित नसून यामध्ये डस्ट पार्टिकल आहेत असे सांगितले. असे असले तरी या बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले असून पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबात योग्य ती कारवाई केली जाणार आहे. असे असताना विरोधकांनी मुद्दाम हा मुद्दा उचलून धरला असून विरोधकांना आपला पराभव पचवता आला नसल्याने हट असे आरोप करत असल्याचा टोला लगावला आहे.
साकेगावात पिण्याच्या पाण्यावरून मोठी समस्या निर्माण झाली असली तरी यात राजकीय घडामोडींचा ऊहापोह दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या विषयाला घेऊन आता कोणत्या स्तरावर वाद वाढण्याची शक्यता आहे याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून असणार आहे. आता या परिस्थितीत साकेगावतील गळती पाईपलाईन आणि दूषित पाण्याचा प्रश्न किती दिवसात सोडवला जाईल हाही प्रश्न उपस्थित होत आहे.