नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा । पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू आहे, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भीती व्यक्त केली. शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा की संपूर्ण राज्यात जाहीर करायचा याबाबत विचार सुरू आहे. जिल्ह्यांमधील नुकसानीची माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षाची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते. मराठवाड्यात 17 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेलं असू शकतं, असं त्यांनी सांगितलं. पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी महापुराचं खापर जलयुक्त शिवारावर फोडलं आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतुल देऊळगावकर तज्ज्ञ आहेत. त्यांची मतं काय आहेत त्यावर विचार होईल, असं ते म्हणाले.