पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा । अपघातातून थोडक्यात बचावले तर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. या वाक्याचा वापर ऐकतो अथवा अनुभवतो. असाच काहीसा अनुभव लासुरे (ता. पाचोरा) येथील अतुल देवरे या शेतकऱ्याबाबत घडला. पुराच्या पाण्यात ते दोघे मदतीला आले नसते अन् त्यांनी उड्या मारल्या नसत्या तर..बैलासह शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले असते.
सदरचा प्रकार जवळ असलेल्या मस्तान तडवी (लासुरे) व सागर कोळी (वरखेडी) यांनी बघितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. प्रथम पुरात वाहून जाणाऱ्या अतुल यांना त्यांनी बाहेर काढले. नंतर एक बैल बाहेर काढला. दुसरा बैलही हाती लागला; परंतु तो मृत झालेला होता. कपिल देवरे यांचा ४० हजाराचा बैल या घटनेत मृत झाला.
आठवडाभरापासून नदीला पूर असल्याने बैलांना पाणी पाजण्याच्या ठिकाणी खड्डा पडला होता. त्यामुळे दोघे बैल गाडीसह पाण्यात पडले. तडवी व कोळी या दोघांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन बैल व शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात मारलेली उडी अतुल देवरे व एका बैलाचा प्राण वाचविण्यात यशस्वी झाली. या दोघांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी रूपाली रायगडे, पशुवैद्यक अधिकारी महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे काळ आला होता, पण तडवी व कोळी यांनी उड्या मारल्या नसत्या तर… याच विषयाची भीतीदायी व थरकाप उडविणारी चर्चा लासुरे व वरखेडी गावात रंगली आहे.