नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा । दुष्काळी मराठवाड्यात यंदा मात्र पावसानं हाहा:कार माजवला आहे. अतिवृष्टीमुळं मराठवाड्याती शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील या पूरस्थितीला काही पर्यावरण तज्ज्ञांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेकडे बोट दाखवलं आहे. मात्र, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केलीय. जलयुक्त शिवारमधील काही कामं चांगली झाली आहेत. सर्वच कामं खराब नाहीत. जलयुक्त शिवारमुळे फायदे आणि तोटेही झाले आहेत, असं पाटील म्हणाले. तसंच तज्ज्ञांच्या मतावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.
यावेळी भाजप-मनसे युतीच्या चर्चेवरुन जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजत आहे. मतदारांमुळे भाजप-मनसेसोबत युती करायला लाजत आहे, असा मिश्किल टोला पाटलांनी लगावला. तसंच शेतकऱ्यांना पैसे वाटून झाले आहेत. आता कारखानदारांकडे पैसे नाहीत. टॅक्स भरावा लागला तर कारखानदारी बंद पडेल. करदाता जगला पाहिजे, तरंच तो कर भरु शकेल. आयकर विभागाने व्यवहारिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असं मतही पाटील यांनी व्यक्त केलंय.
मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वादावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार. दोघांमधील वाद हा महाविकास आघाडीचे राज्य पातळीवरील नेते सोडवतील. अंडरवर्ल्डकडून धमकी आली की कुणी फोन केला याबाबत मला माहिती नाही. हा येवढा मोठा वाद नाही. भुजबळ असं काही करतील असं वाटत नाही, असं पाटील म्हणाले.
मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिलं.