जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ग.स. सोसायटीच्या निवडणुका होणार असून या संदर्भात प्रशासनाने तयारीला लागण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. या निवडणुकांबाबत पालकमंत्री लवकरच आढावा बैठक देखील घेणार आहेत.
याबाबत माहिती अशी की, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात जिल्हा निवडणूक आराखड्यातील दुसर्या टप्प्यातील ३१८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत ग.स. सोसायटी आणि जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक तीन महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तर यासोबत अन्य सहकारी संस्थांच्याही निवडणुका होणार आहेत. यात सहकारी संस्थांमध्ये ड वर्गातील २१४ संचालक मंडळाचा कालावधी संपलेल्या व ११४ प्राधिकृत अधिकारी व अवसायक नेमलेल्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्य शासनाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे निर्देश जारी केल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाने या संदर्भात कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात लवकरच निवडणूक यंत्रणेसोबत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले आहे.