जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । काेणत्याही संस्थेची प्रगती ही त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. अनेकदा कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण यंत्रणेला दाेष दिला जाताे; परंतु कर्मचाऱ्यांनी एकतेच्या भावनेतून एखादा निर्णय घेत तडीस नेल्यास त्याचे सकारात्मक बदल हाेतात. मनपाच्या प्रभाग समिती एकच्या २२ कर्मचाऱ्यांनी बदलांचा स्वीकार करत कामात गती आणताना इतरांपेक्षा वेगळे दर्शवण्यासाठी त्यांच्या पातळीवर ड्रेस काेड स्वीकारला.
महापालिकेत आयुक्तानी अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काेणताही आदेश दिलेला नसताना प्रभाग समिती १ मधील कर्मचाऱ्यांनी एकमताने स्वत:च्या खर्चाने ड्रेस काेडचा पर्याय निवडला आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी गर्दी हाेत असल्याने नागरिक व कर्मचारी यात फरक कळत नसल्याने प्रभाग अधिकारी विलास साेनवणी यांच्या संकल्पनेतून सर्वांनी एकाच रंगाचा ड्रेस परिधान करण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाग समिती १ मधील २२ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ड्रेसकाेड असण्याचा विचार मांडल्यानंतर पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी एकाच रंगावर विचार करण्यात आला. यात पिस्ता रंगाचा शर्ट आणि माेरपंखी रंगाची पॅन्ट अशी निवड करण्यात आली.