जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाच्या अनेक सरकारी धोरणामुळे अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे, औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या देखील बंद झाल्या यामुळे कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे. यामुळे उपासमारीची वेळ देखील आल्याने व्यापार , खरेदी विक्री, तसेच सण उत्सवात आपला व्यवसाय करणाऱ्याच्या पोटाला देखील टाच लागली आहे. गणपती उत्सव झाल्या नंतर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवात मूर्ती मूर्तिकारांकडे कमी बुकिंग झाल्याचे समोर आले आहे. तसेच शासनाने दिलेल्या नियमाचे पडसाद याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.
नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांनी मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू केली असून यंदा कोरोनामुळे मूर्ती व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. मंदीचे सावट असून मोठ्या अडचणींचा सामना मूर्तिकार बांधवांना करावा लागत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेले निर्बंध अनेकांना अडचणीत आणत आहे. दुर्गा मूर्तीची चार फुटाची नियमावली जाहीर केल्याने आर्थिक फटका बसला आहे. लहान मूर्ती पेक्षा मोठ्या मूर्ती मध्ये अधिक पैसे मूर्तिकार बांधवांना मिळतात मात्र शासनाच्या अटी शर्ती मुळे मुर्तीकाराना सतत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यंदा कारागिरांचे पगार देखील काढणे मुश्किल झाले असून कलकत्ता येथून आलेले कारागीर राम पाल यांनी आपल्या व्यथा राजमुद्राशी बोलताना मांडल्या आहेत
मूर्तिकार रामपाल सांगतात की, गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे आम्ही सतत अनेक आर्थिक संकटांना सामोरे जात आहोत. वेगवेगळ्या राज्यात नियम वेगळे असून त्यानुसार आम्हाला नियमात राहून काम करावे लागते. मात्र हेच नियम आता आमच्या जीवावर उठले आहे. कामगारांचे पगार काढणे देखील आम्हाला आता मुश्कील झाले आहे. स्थानिक प्रशासन तसेच शासनाने आमच्या व्यथा समजून आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती बंगाल येथून जळगावात दाखल झालेले मूर्तिकार रामपाल यांनी आपली व्यथा मांडली आहे.