(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्रात झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. सद्यस्थितीत हे वादळ गुजरातकडे प्रवास करत असून महाराष्ट्रामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेत वादळानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. मदतकार्यात कोणत्याही प्रकारे कमतरता निर्माण होणार नाही यासंदर्भात दक्ष राहण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या चक्रीवादळामुळे एकूण सहा जणांचे मृत्यू झाले असून नऊ जण जखमी आहेत. एकूण जवळजवळ 13 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून नागरिकांना बऱ्याच प्रमाणावर मदत केली जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड व नुकसान झाली आहे तेथील कोविड रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये, तसेच पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सुरू असण्या संदर्भात माहिती मिळवली आहे. रस्त्यावरील विजेचे खांब, झाडे त्याचप्रमाणे गावांपर्यंत जाणारे रस्ते मोकळे करून वाहतुकीला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही या संदर्भात आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मच्छीमारांच्याही बोटींचे नुकसान झाल्या संदर्भात माहिती घेतली आहे.
या चक्रीवादळामुळे जवळजवळ अडीच हजाराच्या आसपास घरांची पडझड झाली असून याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात विभागातील आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत माहिती घेत आहेत.
हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज चक्रीवादळाच्या सद्यस्थिती वर चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या 180 किलोमीटर दूर हे वादळ असून त्याचा वेग आता कमी होऊ लागलेला आहे. चक्रीवादळ रात्री आठ नंतर गुजरातमधे प्रवेश करणार असून याचा वेग तिकडे जाऊन वाढण्याची शक्यता होसाळीकर यांनी दिली. महाराष्ट्रात सध्या परिस्थिती स्थिर असली तरी पावसाची शक्यता असून नागरिकांनी दक्ष घेण्यासंदर्भात वैज्ञानिकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.