अकोला राजमुद्रा वृत्तसेवा । शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं.
अमोल मिटकरी यांनी आज आपल्या मूळ गावी कुटासा येथे आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्यावी, अशी मागणी केली.
राज्यातर आपण एकत्र आहोत. पण अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जात असेल, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडूंना समज द्यावी, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.