जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील दोन भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. सन्मुख (वय 19) व गौरी गणेश महाजन (वय 14) अशी सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांची नावे आहेत. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात नेपाळ देशातील पोखरा येथे झालेल्या ‘इंडो-नेपाळ इन्व्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशीप 2020-21’ या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत आपली छाप पाडली. सन्मुख व गौरीच्या चमकदार कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पंजाब राज्यातील अमृतसर येथे ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील योगा स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतातील 65 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या 19 स्पर्धकांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती. जळगावातील सन्मुख व गौरी महाजन या भावंडांचा यात समावेश होता. नेपाळमधील पोखरा येथील कासकीच्या रंगशाळा स्टेडियममध्ये 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान ही आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धा पार पडली. जगभरातील 39 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भारताच्या 19 स्पर्धकांनी 13 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवली. सन्मुख व गौरीने यातील 2 सुवर्णपदके पटकावली.