मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठं यश मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिलहा परिषदेच्या 85 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 33 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 17 जागा जिंकल्या. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी महाविकास आघाडीने 73 जागा जिंकल्या तर भाजपला 33 जागांवर यश मिळालं. अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागले. कुठे राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला, तर कुठे सर्वसामान्य उमेदवारांनी दिग्गजांना धूळ चारली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधून आज मुंबईत देवाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर बाचचित केली. झेडपी निकालावर प्रतिक्रिया देताना या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, असं अजित पवार म्हणाले.
“प्रत्येकाला वाटत होतं निवडणूक होऊच नये. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारख्या जाहीर सभा घेता येत नव्हत्या. मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. परंतु या सगळ्या वातावरणात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. जनतेनं समाधानकारक निकाल दिला आहे. पण असं असलं तरी मी आनंदी पण नाही आणि दु:खी पण नाही”, असं अजित पवार म्हणाले.