चोपडा राजमुद्रादर्पण । तालुक्यातील दक्षिण भागात तापी नदीकाठावर असलेल्या काही भागांत बुधवारी (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास चक्रीवादळ गारपिटीसह मुसळधार पावसाने हजारो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तापी नदीकाठावरील अनवर्दे, घाडवेल, विचखेडा, धुपे, दोंदवाडे या गावात विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्धातास जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळी काही मिनिटे गारपीट झाल्याने मका, कापूस, ऊस, पपई, ज्वारी, बाजरी, केळी यासह अन्य पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. वेचणीवर आलेल्या कापसाचे अगोदरच नुकसान झाले होते. त्यात पुन्हा गारपिटीने पिकांचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.
जवळपास १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज माहिती कृषी विभागाने दिली आहे. तसेच दोंदवाडे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षकभिंतीवर झाड कोसळले. यात मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तत्काळ दखल घेत दोंदवाडे सरपंच प्रभावती पाटील, उपसरपंच मनोज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार अनिल गावित यांना याबाबत माहिती देत तत्काळ पंचनामे करण्याबाबत सांगितले.