मुंबई राजमुद्रादर्पण । जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी अखेर राज्य सरकारनं 365 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागात शेतीचं आणि घरांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून आता मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सप्टेंबरच्या अखेरिस विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून कधी मदत दिली जाणार? असा सवाल केला जातोय.
सप्टेंबरच्या अखेरिस संपूर्ण मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडिद, ऊसासह फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी पात्र सोडल्यानं शेतजमीनही वाहून गेली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. त्यासाठी पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडला जाऊ नये, अशी मागणी विरोधकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जात पाहणी केली होती. तेथील शेतकऱ्याशी संवाद साधून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.