रावेर राजमुद्रादर्पण । जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून प्रथमच यावर्षी इराण या देशात केळी निर्यातीला सुरवात होत आहे. मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर एक कंटेनर केळी निर्यात झाल्यावर नियमितपणे ही कापणी आणि निर्यात होणार आहे.केळी निर्यात मार्च ते जून महिन्यात होते. केळी उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या निर्यात कंपनीच्या मदतीने आता ऑक्टोबर महिन्यात देखील प्रथमच केळीची निर्यात होणार आहे. ही निर्यात होणारी केळी जामनेर तालुक्यातून उत्पादन झाली आहे हे विशेष! यावर्षी जामनेर पट्ट्यातून प्रथमच १०० कंटेनर्स केळी निर्यात होण्याची अपेक्षा असून पुढील वर्षी ३०० कंटेनर्स केळी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. केळी निर्यात मुख्यत्वे रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातून होते. या निर्यातीचा काळही मार्च ते जून असा ठरलेला आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत केळीची मागणी वर्षभर असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील जामनेर, पहुर, पिंपळगाव भागात चांगले केळी उत्पादन होते, याचे निरीक्षण तांदलवाडी (ता. रावेर) येथील महाजन बनाना एक्सपोर्टस्चे संचालक प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांनी केले होते.