(कमलेश देवरे)
जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घटना घडताना जिल्हावासियांना पाहायला मिळाल्या, यामध्ये जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनल असावे अशी तीव्र इच्छा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकमेकांचे कट्टर राजकिय विरोधक असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांना एकत्र आणले. दुर्मिळ असणारी घटना गुलाबराव पाटील यांनी घडवून आणली. सतत चाललेल्या बैठकांनंतर अखेर सर्वपक्षीय पॅनल चा फार्मूला सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ठरवण्यात आला यामध्ये सर्वपक्षीय पॅनलचे नेतृत्व करणारे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना अखेर मोठे राजकीय यश आले आहे.
सर्वपक्षीय पॅनमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वपूर्ण असताना यामध्ये खडसे आणि महाजन यांना एकत्र आणणे कसरतीचे काम होते दोघांचे एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना तसेच ईडी आणि बीएचआर प्रकरण सुरू असताना मात्र कट्टर विरोधक असणाऱ्या या दोन नेत्यांना एकत्र आणले गुलाबरावांनी अखेर करून दाखवले. यामुळे सर्वपक्षीय पॅनल चे नेतृत्व गुलाबराव पाटील करतील यावर आता राजकीय शिक्का मोर्तब झाला आहे. यामुळे गुलाबरावांचे जिल्ह्यातील राजकीय वजन देखील वाढल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यात गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या अपंगत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. व त्यांना प्रमाणपत्र कसे देण्यात आले यावर देखील आक्षेप नोंदविला होता तसेच खडसे यांनी देखील गिरीश महाजन यांच्या कडे बाराशे कोटीची मालमत्ता कशी आली. याबाबतचा सवाल उपस्थित केला होता यामुळे दोघांमधील राजकीय वैर अधिक वाढल्याचे दिसून आले होते
आरोप-प्रत्यारोपांच्या केल्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यामुळे जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल चे निवडणूक शक्य नसल्याचे तर्क लढवले जात होते. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन व खडसे या दोघा नेत्यांमध्ये सर्व पक्षीय पॅनलसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पॅनल संदर्भात संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सतत महाजन आणि खडसे यांच्या संपर्कात होते, सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अखेर सर्व पक्षीय पॅनल स्थापन करण्यात यश आले आहे.