मुंबई राजमुद्रा दर्पण । भारतीय गुंतवणूकदार हे नेहमीच गुंतवणुकीवर मिळवणाऱ्या परताव्यापेक्षा सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळेच जुन्या पिढीतील बहुतांश लोक अजूनही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगल्या परताव्यासोबत सुरक्षिततेची हमी असते.
जर तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी बचत करण्याचा उत्तम पर्याय सिद्ध आहे. या स्कीममध्ये, ठेवीदाराला त्याच्या डिपॉझिटवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. किसान विकास पत्र योजनेचा दावा आहे की, या अंतर्गत तुमची ठेवीची रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत (124 महिने) दुप्पट होईल.
किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने 1988 मध्ये लाँच केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मर्यादा नाही. सरकारने 2014मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र 50 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर 10 लाखांहून अधिक गुंतवणूक केली तर उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इनकम टॅक्स रिटर्न सोबत जोडावे लागते.
18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकते. ग्रामीण भागात बँकेची सुविधा कमी असल्याने तेथे या योजनेचे आकर्षण अधिक आहे. या योजनेची खासियत म्हणजे मार्केटमध्ये कितीही उलाढाल झाली तरी या योजनेत रिटर्नची खात्री आहे. या योजनेत प्रत्येक तीन महिन्यांसाठी व्याजदर लागू होतो. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदर 6.9 टक्के असले तरी व्याजदर वर्षिक मोजले जाते. मात्र यात फायदा चांगला आहे.