जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरातील नागरिकांच्या मालमत्तेत कोणतीही कर व दरवाढ केलेली नाही, १७ वर्षानंतर मिळकतींचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. ज्यांच्या मिळकतीत बदल झाले आहे. त्यांच्याच मिळकतीत करयोग्य मूल्य बदल केला आहे, असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यानी पत्रकार परिषदेत दिले.
शहरात महापालिकेवतीने मालमत्तेच्या फेरमूल्यांकनाच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यात अनेकांना जुन्या घरपट्टीकरऐवजी नवीन वाढीव घरपट्टीकर आकारणी करण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे घरपट्टी करवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे नागरिकांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. याबाबत महापालिकेतर्फे आपली भूमिका मांडण्यासाठी आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपाचे व्ही. ओ .सोनवणी उपस्थित होते.
महापालिकेतर्फे दर पाच वर्षांनी शहरातील मिळकतींचे फेरमूल्यांकन करण्याचा नियम आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात महापालिकेच्या मिळकतीचे फेरमूल्यांकन झालेच नाही. आता ते करण्यात आले आहे. शिवाय आता फेरमूल्यांकन करताना कोणतेही नवीन दर लावण्यात आलेले नाही. महापालिकेचे करयोग्य मूल्य आकारणी दर हे सन २००० पासूनचे असून आताही त्यात बदल करण्यात आलेला नाही. ज्यांनी आपल्या जागेत कोणताही बदल केलेला नाही, त्यांच्या आकारणीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु ही आकारणी तब्बल वीस वर्षानंतर होत असल्यामुळे त्याचे करयोग्य मूल्य अधिक वाटत आहे.
मालमत्ता कराच्या नोटीस दिल्यानंतर अनेक नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगून आयुक्त कुळकर्णी म्हणाले, प्रभाग चारमधील नागरिकांना दिलेल्या नोटीसवर मंगळवार (ता. १२)पासून सुनावणी करण्यात येणार आहे.
शहरातील मालमत्तेत करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनामध्ये ३५ कोटी रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती आयुक्त कुळकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, महापालिकेतर्फे घरगुती करआकारणी ३८ टक्के तर वाणिज्य कर आकारणी ५० टक्के करण्यात येते. १ लाख १८ हजार मिळकतीचे फेरमूल्यांकन करण्यात आले. पूर्वी महापालिकेची कराची मागणी २८ कोटी रुपये होती, त्यात आता वाढ झाली असून ती ४८ ते ५० कोटी रुपये झाली आहे. शहरात २६ हजार मिळकती वाढल्या आहेत.