(राजमुद्रा वृत्तसेवा) बेहिशेबी मालमत्ता बाळगळ्याच्या प्रकरणातून शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती दुपारी समोर आली आहे. टॉप्स ग्रुप सिक्युरीटी कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून ही चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
नोव्हेंबर २०२० मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केल्यानंतरप्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेले अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली होती. आज अचानक ईडीचे अधिकार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर दाखल झाले.
टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जाऊन ३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यांची सगळी रक्कम टॉप्स ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून समोर आली होती. यापैकी काही रक्कम प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला असल्याने या तपासाचे चक्र अधिक गतीने फिरवले जात असल्याचे दिसून येत आहे.