(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचाराकरता अतिआवश्यक असलेल्या रेमडीसीविर इंजेक्शनची विक्री छापील किंमतीपेक्षा जास्त दराने करत काळाबाजार करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील दादरच्या कुबतरखाना परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच कडून ही कारवाई करण्यात आली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची ही मोठी कारवाई म्हटली जात आहे.
रेमडीसीविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ५ ची ही मोठी कारवाई मानली जात आहे. हे दोघे रेमडेसिव्हिरची काळ्या बाजारात २५ हजारांना विक्री करत होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ५ रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट पाचला सोमवारी या बाबतची गुप्त माहिती मिळाली. रेमडीसीविरच्या मूळ किमतीच्या अंदाजे ५ ते ६ पट जास्त जास्त दराने विक्री केली जात होती. या माहितीच्या आधारावर दादरच्या कबुतरखाना परिसरात एम. सी. जावळे मार्गावर पोलिसांनी सापळा रचला असता एक इसम रेमडेसिव्हिरची इंजेक्शन्स २५ हजारांना विकत असल्याचे समजले. पोलिसांना त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून अधिक तपासात अजून एकाच्या मुसक्या आवळल्या.