नागपूर राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती तर ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.
मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणे चुकीचा अर्थ लावला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजही जनता ते मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवलं. गावागावत लोक म्हणत होते, साहेब तुम्ही असायला हवे होते. यावरून त्यांना आजही मला लोकांमध्ये गेल्यावर मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं. कारण लोकांना उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाहीये. ते बाहेर पडणार नाहीत हे त्यांनी गृहितच धरलंय. प्रत्येक वेळेला जीवाचा आकांत करून फडणवीसच फिल्डवर आहेत. त्यामुळे साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसले तरी मुख्यमंत्रीच वाटता, असं लोकं म्हणत आहेत. त्या संदर्भानेच फडणवीसांनी ते विधान केलंय, असं पाटील म्हणाले.