बीड राजमुद्रा दर्पण । भाजप नेत्या पंकजा मुंडेंपाठोपाठ आता खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधला आहे. विकासाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण-भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिले पाहिजे. अशी टीका प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे.
यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनामध्ये मला गतवर्षी मेळाव्याला येता आले नाही. मात्र यंदा उत्साह आहे. हा मेळावा कष्टकऱ्यांचा आहे. भगवान बाबांच्या अनुयायांचा आहे. गतवर्षी गुन्हे दाखल झाले, बीड जिल्ह्यात खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले. केक कापले गेले, जेसीबीने फुले उधळली गेली. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रीतम मुंडे या भगवानगडावर येत आहेत. या परिसरात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याचा त्या आढावा घेत आहेत. तसेच काही सूचनाही संबंधितांना देत आहेत.