पिंपरी चिंचवड राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांचा पिंपरी चिंचवड दौरा करणार आहेत. शनिवारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक होणार असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक, तर रविवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.