बीड राजमुद्रा दर्पण । बीड जिल्ह्यात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. दुसरा नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा. तिसराही नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा म्हणजे भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. या चारही मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. त्यातही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवान गड अधिक चर्चेत आला. भगवान गडचा इतिहास नेमका काय आहे? भगवानबाबा कोण होते?
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सावरगाव आहे. या ठिकाणी भगवानगड आहे. भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते. या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र, भगवानबाब या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडूजी सुरू केली. त्यामुळे या गडाला भगवानबाबांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 1958 मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.
भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.
गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा साजरा करायचे. 1994पासून त्यांनी ही परंपरा सुरू केली. अनेक वर्ष त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. मुंडे यांच्या निधानानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, 2016मध्ये या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. मात्र, त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. मात्र, 2017मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 किलोमीटरवर आहे. पंकजांनी या ठिकाणाहून नव्या परंपरेला सुरुवात केली.
सावरगाव हे भगवानबाबांचं जन्मगाव. या गावी अडीच एकरामध्ये भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यांच्या जुन्या वाड्याची डागडूजी करण्यात आली. समाधी मंदिरही तयार करण्यात आलं. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी भगवानबाबांची 25 फुटांची मूर्ती बनवली. पंकजा मुंडे यांनी सावरगावात दुसरा भगवान भक्तीगड निर्माण केला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला, तर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य व्यासपीठही उभारले आहे. 2017पासून या नव्या भगवान भक्तीगडावर त्यांनी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांना ऑनलाईन मेळावा घ्यावा लागला होता.