एरंडोल राजमुद्रा दर्पण । तीनच दिवसांपूर्वी आई, वडील आणि मित्रांना भेटून गेलेल्या संगणक अभियंत्याचा बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत पुण्यात अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे परिवारातील एकुलता एक मुलगा गमावल्याने आई, वडील आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
वडगाव सतीचे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी व हल्ली येथील लक्ष्मीनगरमधील रहिवासी निवृत्त ग्रामसेवक गणसिंग रामसिंग पाटील यांचा एकुलता एक मुलगा शैलेंद्र गणसिंग पाटील (वय ४१) हा मलेशियातील क्वालालांपूर येथे एका कंपनीत सॉफवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. एका वर्षापूर्वी त्यांनी मलेशियातील नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यात एका कंपनीत इंजिनिअर म्हणून लागला होता. तो बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीने जात असताना दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. त्यात तो खाली पडला आणि डंपरच्या चाकाखाली सापडल्यामुळे गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्यास दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
शैलेंद्रचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समजताच त्याच्या लक्ष्मीनगरमधील निवासस्थानी मित्र परिवार आणि नागरिकांनी गर्दी केली. तीन दिवसांपूर्वी भेटलेला मित्राचा अचानक अपघाती मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत मितभाषी असलेल्या शैलेंद्रच्या अनेक आठवणींना त्यांच्या मित्रांनी उजाळा दिला. शहरातील उद्योजक आणि मित्र परिवार मलेशिया येथे गेले असता शैलेंद्रने केलेल्या आदरातिथ्यामुळे सर्वजण भारावून गेले होते. निवृत्त ग्रामसेवक गणसिंग पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.