मुंबई राजमुद्रा दर्पण । शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांविरोधात केंद्राकडून केला जाणारा ईडी, सीबीआयचा वापर ते हिंदुत्व या विषयांवरुन त्यांनी भाजपा, आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. “दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची आता मात्र सगळंच अळणी” असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केले होते. माझ्या भाषणानंतर अनेकजण टीका करतील पण मला फरक पडत नाही, तुम्ही चिरकताय, कितीही चिरका पण माझा वाडा चिरेबंदी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शिवसेनेचा दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी दसऱ्याला हा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यातून आधी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्य आणि देशातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करायचे. आता उद्धव ठाकरे तीच पंरपरा पुढे चालवत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सर्वांचेच लक्ष असते.