(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकून पडलेला आहे. सदर पुलाचे काम फार संथ गतीने होत असून ठरवून दिलेल्या 24 महिन्यांच्या कालावधी पेक्षा जास्त वेळ निघून गेल्यावरही हे काम रखडले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन गुप्ता यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना आज दिले.
सदर पुलाच्या जोड रस्त्याच्या कामाच्या अपूर्णतेमुळे शिवाजीनगर मध्ये जाणारा रेल्वे स्टेशनचा मागील रस्ता गेल्या एक वर्षांपासून बंद केला आहे. पुलाचे काम संथगतीने सुरू असताना या रस्त्यजवळील कामही गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असून नागरिकांना पायी जाण्यासाठी कोणतीही जवळची सोयीची वाट नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. शिवाजीनगरच्या नागरिकांना शहरात यायचे असल्यास फार मोठ्या फेऱ्याने यावे लागते. हा प्रवास फार त्रासदायक असून विनाकारण मक्तेदारांच्या संथ गतीच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयाजवळील मार्गाचीही तशीच अवस्था असून प्रत्यक्ष तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही याचा फार मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती दिककुमार गुप्ता यांनी आपल्या निवेदनात दिली आहे.
जिल्हा परिषदेसमोरील विद्युत पोलही सध्या आजूबाजूला केलेल्या खोदकामामुळे विनाआधार उभे असल्याने मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतात. या कामाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर असतांनाही कोणतीही हालचाल नसल्याने या बाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी दिला आहे.
सदरील काम ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावी. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करून याची माहिती जाहीर करण्यात यावी यासंदर्भात आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले. सदर विषयावर योग्य ती कारवाई न झाल्यास ७ जून २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आले. सोबतच या विषयाची न्यायालयात याचिका ही दाखल करण्यात येईल असा इशाराही गुप्ता यांनी दिला आहे.