मुंबई राजमुद्रा दर्पण । आयकर विभागाने मुंबईत दोन रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी केली आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरही छापे मारण्यात आले आहे. त्यांच्याकडून आयकर विभागाने 184 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या. 7 ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सीबीडीटीच्या या प्रेस रिलीजच्या आधारे अजित पवारांच्या संबंधितांचे 184 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या दोन्ही समूहाकडे 184 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दिवशी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत 2.13 बेहिशोबी मालमत्ता आणि 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.
राज्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या कुटुंबीयांकडे ही संपत्ती सापडल्याचं सीबीडीटीने म्हटलं आहे. सीबीडीटीने प्रेस रिलीजमध्ये अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी ही संपत्ती अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेच सापडल्याचे संकेत दिले आहेत. ही बेहिशोबी संपत्ती मुंबईतील कार्यालय, दिल्लीत एका पॉश परिसरात फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रात शेत जमीन आणि साखर कारखान्यात गुंतवण्यात आली होती. या सर्व बेहिशोबी मालमत्तेची किंमत 170 कोटीच्या जवळपास असल्याचंही सांगण्यात आलं आहे.