मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकर भरतीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता आपली परीक्षा रद्द केली होती. सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, याचं गांभीर्य सरकारला नाही, असा घणाघात पडळकर यांनी केलाय.
प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतकं होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारत आहेत. त्यांची संधी नाकारली जात आहे. एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही. काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरत असल्याचा हल्लाबोलही पडळकर यांनी केलाय.
24 आणि 31 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा होणार आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज उमेदवारांनी भरले आहेत. सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. जिल्हा बदलून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळाल्याचंही समोर आलं आहे. तर, प्रवेशपत्रावरील पिनकोडही चुकीचं आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वी तांत्रिक गोंधळामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली होती. यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं होतं.