रावेर राजमुद्रा दर्पण । रावेर येथील पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रितरित्या लढण्यावर स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. तरी प्रभाग रचना आणि आरक्षण झाल्यावर जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.
आमदार शिरीष चौधरी यांनी शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महा विकास आघाडीतील घटक पक्षांच्या पालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रमुख नेत्यांशी याच विद्यालयाच्या कार्यालयात चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीतील वरील तीनही पक्ष असल्याने रावेर पालिकेची निवडणूक देखील या तीनही घटक पक्षांनी आघाडी करून लढवावी असा विचार श्री. चौधरी यांनी मांडला. त्यावर उपस्थित सर्वांनीच अनुमोदन दिले आहे.तीनही पक्षांचे जागावाटप आणि उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय अजून घेता येणार नाही; अंतिम प्रभाग रचना आणि जागांचे आरक्षण जाहीर झाल्यावरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा अशी सूचना विविध कार्यकर्त्यांनी मांडली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने रावेर पालिकेतही सत्ता मिळाल्यास विकासासाठी आधिक निधी मिळवणे शक्य होईल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रल्हाद महाजन, रमेश महाजन, हरिष गनवाणी,अनिल अग्रवाल, प्रकाश मुजुमदार,सोपान पाटील,आसिफ मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन , नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, रविंद्र पवार, डाँ. राजेंद्र पाटील, मेहमूद शेख, प्रणित महाजन आदी उपस्थित होते.