अमळनेर राजमुद्रा दर्पण । गांधली शिवारातील शेतातून १७ ला भल्यापहाटे चोरीस गेलेल्या शेळ्यांचा शोध अवघ्या काही तासांमध्ये लावून मध्य प्रदेशातील सेंदवा भागातून चोरीला गेलेल्या शेळ्या व दोन संशयिताना अमळनेर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालंदरनाथ सुरेश चौधरी यांच्या शेतातून रखवालदाराला घरात डांबून रविवारी (ता. १७) पहाटे ८ ते १० लोकांनी ६३ शेळ्या चोरुन नेल्या होत्या. त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
फिर्यादीत संशयित चोरी करताना पावरा भाषेत बोलत होते. या माहितीवरून पोलिस निरीक्षक हिरे यांनी मध्य प्रदेश राज्याला लागून चोपडा शहर व ग्रामीण, शिरपूर, सांगवी येथील पोलिस ठाण्यांना या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची माहिती कळविली असता त्यावरून सेंधवा येथे दुपारी एका पिकअप वाहनात ३० शेळ्या विक्रीस आल्या होत्या. त्यातील ५ ते ६ शेळ्या एका खाटीकाने घेतल्या आहेत. या शेळ्या चोरीच्या असण्याची शक्यता आहे, अशी माहिती बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, कर्मचारी शरद पाटील, मिलिंद भामरे, अमोल पाटील यांचे पथक सेंधवा येथे रवाना केले होते. तेथील सेंधवा बाजारात शेळींचा खाटीक व्यावसायिकांकडे शोध घेत असताना पोलिस निरीक्षक हिरे यांना पुन्हा बातमी मिळाली, की सेंधवा तालुक्यातील बोरली गावात एका घरात २० ते २५ शेळ्या कोंडून ठेवल्या आहेत. यावरुन रात्री सेंधवा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मदतीने वरील पथकाने गावातील या घराचा शोध घेऊन गुन्ह्यातील २१ मोठ्या व ५ लहान शेळ्या शोधून काढल्या. पोलिस पथकासोबत गेलेल्या फिर्यादीने सर्व शेळ्या त्याच्याच असल्याचे ओळखून सांगितल्याने त्या ताब्यात घेतल्या तसेच गुन्ह्यात रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील जप्त केली आहे.
त्या ठिकाणी असलेला संशयित सनालिया सोलंकी यास ताब्यात घेऊन याच्याकडे चौकशी करता या शेळ्या अमळनेर येथून चोरी करताना त्याच्यासोबत मुकेश रिंजडिया ठोकरे (पावरा) (रा. बक्तरिया, डुटला), ओंकार बारेला (रा. बक्तरिया), भाया कावला भिलाला (रा. बक्तरिया), रवी सुभाराम सोलंकी (रा. बोरली), तसेच मुकेश ठोकरे याच्यासोबत त्याचे दोन मित्र असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या गुन्ह्याचा सखोल तपास पोलिस निरीक्षक हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपपनि शत्रुघ्न पाटील हे करीत आहेत.